औरंगाबाद:- मराठवाड्यात दोन मागील दिवसांपासून थंड वातावरण निर्माण झाले आहे. सध्याचे वातावरण पहाता पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात येत्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ कृषी , हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
मागील आठवड्यात थंडी कमी झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून अचानक शहरात गार वारा सुटला आहे. थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे पाऊस पडतो की काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. यावर हवामान तज्ञांशी चर्चा केली असता ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ.साबळे यांनी सांगितले की, सध्याचे वातावरण पहाता पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात ढग जमा होत आहे. पूर्व किनारपट्टी म्हणजे बंगालच्या उपसागराच्या भागाकडून मोठ्या प्रमाणात बास्फ पूर्व विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्वेकडे येत आहे. त्यामुळे ढग जमा होत आहे. त्यामुळे दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या विदर्भाच्या पूर्व भागात तसेच नांदेड, परभणी, लातूर या मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहील. मात्र कमाल आणि किमान तापमानात फारसे बदल होणार नाही. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंडीची तीव्रता राहील. त्याचा परिणाम सध्याचे वातावरण जसे आहे तसेच राहील. सध्याचे तापमान पहाता कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान १४ ते १५ अंश सेल्सिअस असे आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक थंडीची तीव्रता आहे. तेथे किमान तापमान १० अंश सेल्सिअस एवढे राहील. तसेच महाबळेश्वर या ठिकाणी सर्वाधिक थंडी राहील. असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.